राज्यात गोहत्या बंदी कायदा करण्यात आला आहे. मात्र, तरीही गोतस्करांवर अंकुश लावण्यासाठी आता गोतस्करांवर आता थेट ‘मकोका’ कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्याचे आदेश गृह विभागाने दिले आहेत. तसेच गोवंशाची अवैध वाहतूक, अवैध कत्तल, अनधिकृत कत्तलखाने यांना प्रतिबंध करणे तसेच संबंधित कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. तसेच, इतर आनुषंगिक नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.संबंधित सर्व महानगरपालिका / नगरपरिषदा / नगर पालिका / नगर पंचायती तसेच, सर्व जिल्हा परिषदा/ पंचायत समिती व ग्राम पंचायत यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील अनधिकृत तथा विनापरवाना कत्तलखाने शोधून त्यांच्यावर नियमोचित कारवाई करावी. तसेच, कोणत्याही क्षेत्रात अनधिकृत तथा विनापरवाना कत्तलखाने असणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असे सूचविण्यात आले आहेत.
प्रचलित असलेले कायदे व नियम यांचा भंग करून वारंवार संघटित पद्धतीने गोतस्करी करणार्या व्यक्ती, टोळ्या अथवा संघटनांविरुद्ध संबंधित पोलीस यंत्रणेने प्रचलित नियमानुसार तपास करून महाराष्ट्र संघटित गुन्हे नियंत्रण अधिनियम (मकोका) अंतर्गत नियमोचित कारवाई करण्यात येणार आहे. राज्यातील परिवहन/वाहतूक विभागाने उपरोक्त प्रमाणे अवैधरीत्या गोवंश वाहतूक करणार्या वाहनांची नियमित तपासणी करुन संबंधित वाहनांवर मोटार वाहन अधिनियम व इतर आनुषंगिक कायदयांनुसार नियमोचित कारवाई करावी.
राज्यातील सर्व पोलीस अधीक्षक कार्यालये, पोलीस आयुक्तालये त्याचप्रमाणे पशुसंवर्धन आयुक्तालय व परिवहन आयुक्तालय यांनी आपल्या स्तरावरून स्वतंत्र नोडल अधिकारी नियुक्त करावेत. नियुक्त अधिकार्यांचे संपर्क क्रमांक सर्व संबंधित विभागांना आणि नागरिकांना उपलब्ध करून द्यावेत.महाराष्ट्र राज्याच्या सीमावर्ती भागातील प्रत्येक जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा, परिवहन कार्यालये, नागरी/ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था, पशुसंवर्धन कार्यालये या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश असलेली सीमा भागावर इतर राज्यातून महाराष्ट्र राज्यामध्ये प्रवेशाच्या ठिकाणी संयुक्त तपासणी चौकी स्थापन करावी.राज्यातील सर्व संबंधित विभागांनी संयुक्त भरारी पथके स्थापन करून अवैध गोवंश वाहतूक व बेकायदेशीर कत्तलखाने यांवर नियमोचित कारवाई करण्यात यावी. गोवंशाचे जतन व संवर्धन प्रभावीपणे करण्यासाठी डायल 112 या हेल्पलाईन क्रमांकावर गो तस्करी, गोवंश जनावरांची अवैध वाहतूक, अनधिकृत कत्तलखाने याअनुषंगाने तक्रारी प्राप्त झाल्यानंतर संबंधित पोलीस यंत्रणेने उक्त तक्रारीवर तात्काळ कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.


