सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला वर्ष उलटून गेली तरी त्यांच्या मारेकऱ्याला अद्याप कोणतीही शिक्षा सुनावण्यात आली नाही. अशातच आता बीडच्या परळीमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. परळी शहरातील नवीन अरुणोदय मार्केट परिसरात हॉटेल व्यवसायिक कारभारी आंधळे यांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. ही घटना मध्यरात्री अरुणोदय मार्केट ते बस स्टँड रोडवरील मैदानात घडली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेल व्यवसायिक कारभारी आंधळे हे नेहमीप्रमाणे गावाकडे जात होते. नेहमी त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा असायचा, हत्येच्या दिवशी मात्र तो त्यांच्यासोबत नव्हता. याचाच फायदा घेत दोन आरोपींनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला. हल्लेखोरांनी त्यांच्या मानेवर धारदार शस्त्राने वार केल्याने ते गंभीर जखमी झाले.
जखमी अवस्थेत असतानाच आंधळे यांनी आपल्या मुलाला फोन केला. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी रात्रीच घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह पुढील तपासणीसाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात पाठवला. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.पैशाच्या देवाण-घेवाणीवरून हा वाद झाल्याची माहिती फिर्यादी ओमकेश कारभारी आंधळे यांनी आपल्या फिर्यादीमध्ये दिली आहे . दरम्यान,या प्रकरणात परळी शहर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला असून आज सकाळी एका आरोपीला ताब्यात घेतले. मात्र दुसरा आरोपी फरार झाल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.या घटनेमुळे परळी शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून व्यापारी व नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. हत्या मागील नेमके कारण काय, किती आरोपी सहभागी होते, याचा तपास परळी शहर पोलीस करीत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील तपास सुरू असल्याची माहिती दिली आहे.


