अहिल्यानगर शहरामध्ये वारंवार खंडित होत असलेल्या वीज पुरवठ्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आंदोलन
अधिकाऱ्यांना काळे फासण्याचा इशारा
उन्हाळ्यात अधिकारी स्वतःची काळजी घेतात, जनतेची कधी घेणार? – संपत बारस्कर
अहिल्यानगर : शहरामध्ये कोणतीही पूर्वसूचना न देता विद्युत विभागाच्या वतीने वारंवार वीज पुरवठा खंडित केला जात असल्यामुळे भर उन्हाळ्यात नागरिक त्रस्त झाले आहेत. दिवसा आणि रात्री सतत होणाऱ्या वीजखंडितीमुळे नागरिकांना उष्माघाताचा त्रास सहन करावा लागत असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांचे मोठे हाल होत आहेत. वारंवार लाईट जात असल्यामुळे व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होत असून शहराचा पाणीपुरवठाही विस्कळीत होत आहे. या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महावितरण विभागाविरोधात आंदोलन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी अधीक्षक अभियंता रमेश कुमार पवार यांना निवेदन देत येत्या आठ दिवसांच्या आत वीज पुरवठ्याबाबत ठोस उपाययोजना न केल्यास कोणत्याही क्षणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अधिकाऱ्यांना काळे फासण्यात येईल, असा तीव्र इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी अधीक्षक अभियंता रमेश कुमार पवार यांना निवेदनाद्वारे दिला.
यावेळी नगरसेवक कुमारसिंह वाकळे, सुरेश बनसोडे, प्रकाश भागानगरे, प्राध्यापक माणिक विधाते, संभाजी पवार, साधना बोरुडे, रोहिणी अंकुश, सागर गुंजाळ, सुरज कोतकर, सुरत शिंदे, दीपक खेडकर, नितीन घोडके, रणजीत सत्रे, मनोज नन्नवरे, दीपक गांगर्डे, मारुती पवार, ऋषिकेश ताठे, शैलेश मते आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपत बारस्कर म्हणाले की, अहिल्यानगर शहरामध्ये दिवस-रात्र कोणतीही पूर्वसूचना न देता वीज पुरवठा खंडित केला जात आहे. भर उन्हाळ्यात नागरिक त्रस्त झाले असून अधिकारी मात्र एसी कार्यालयात बसून स्वतःची काळजी घेत आहेत. जनतेच्या हालअपेष्टांकडे दुर्लक्ष केले जात आहे. लाईट गेल्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत असून पाणीपुरवठाही विस्कळीत होत आहे. नागरिकांनी वीजबिल एक दिवस जरी भरले नाही तर महावितरण विभाग तत्काळ कनेक्शन कट करतो. मात्र वारंवार होणारी ट्रिप लाईट सुरू करण्यासाठी विभागाकडे वेळ नसतो. त्यामुळे हा सर्व प्रकार जाणीवपूर्वक होत असल्याचे दिसून येते.
ते पुढे म्हणाले की, “पावसाळ्यापूर्वी महावितरण विभागाने आवश्यक उपाययोजना कराव्यात. नागरिकांच्या तक्रारी तत्काळ सोडवण्यासाठी स्वतंत्र टोल फ्री नंबर जाहीर करावा. नागरिकांना योग्य सेवा देणे ही विभागाची जबाबदारी आहे. मात्र त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. येत्या आठ दिवसांत परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणतीही पूर्वसूचना न देता तीव्र आंदोलन करेल आणि संबंधित अधिकाऱ्यांना काळे फासण्यात येईल.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, “अहिल्यानगर शहर व उपनगरामध्ये वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिकांना मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये दिवसा तसेच रात्री होणाऱ्या वीजखंडितीमुळे उष्माघाताचा धोका वाढला आहे. ही गैरसोय महावितरण विभागाकडून जाणीवपूर्वक केली जात असल्याचे दिसून येते. नागरिकांनी बिल भरले नाही तर तत्काळ वीजपुरवठा खंडित केला जातो, मात्र खंडित झालेली लाईट सुरू करण्यासाठी विभागाकडे वेळ नसतो.
“महावितरण विभागाने तातडीने सुधारणा केली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आपल्या दालनात कोणतीही पूर्वसूचना न देता तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना काळे फासण्यात येईल. त्यानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीस पूर्णपणे महावितरण विभाग जबाबदार राहील,” असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.


