अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक, अहिल्यानगरमधील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन

अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दूध भेसळीच्या विरोधात सुरू केलेल्या मोहिमेचे स्वागत करण्यासाठी खडकी (ता. अहिल्यानगर) येथील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक केला. यावेळी तुकाराम मुंढे यांची अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त पदावरून किमान तीन वर्षे बदली होऊ नये अशी मागणी करण्यात आली. त्यासाठी घोषणाबाजी करण्यात आली.

अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दूध भेसळीच्या विरोधात मोहीम सुरू केल्याने बाजारातील कृत्रिम व भेसळीचे दूध कमी होऊ लागले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडील दूध बाजारात येऊ लागले आहे. त्याला योग्य मोबदला मिळण्यास त्याचा उपयोग होणार आहे. नागरिकांनाही चांगल्या प्रकारचे नैसर्गिक दूध उपलब्ध होईल, असे खडकी येथील दूध उत्पादक नंदू रोकडे यांनी सांगितले.

अधिक माहिती देताना राहुल बहिरट यांनी सांगितले की, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात दुग्ध व्यवसाय हा शेतकऱ्यांचा आर्थिक कणा समजला जातो. या व्यवसायात भेसळखोरांमुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. परंतु अन्न व औषध प्रशासन विभागाची सूत्रे मुंडे यांनी घेतल्यानंतर त्यांनी दूध भेसळीच्या विरोधात सुरू केलेल्या धडक मोहिमेमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना संजीवनी मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या घामाला दाम मिळेल. नैसर्गिक दूध उत्पादनास योग्य दर मिळेल, या अपेक्षेने शेतकरी सध्या आयुक्त मुंडे यांच्याकडे पाहत आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुकाराम मुंढे यांची कमीतकमी तीन वर्षे या पदावरून बदली करू नये, अन्यथा राज्यातील शेतकरी चक्काजाम आंदोलन करतील. सध्या भेसळयुक्त अन्न व दूधामुळे नागरिकांना विविध प्रकारचे आजार जडले आहेत. त्याला प्रतिबंध घालण्याची मोहीम तुकाराम मुंढे यांनी सुरू केली आहे. त्यामुळे बाजारातील भेसळयुक्त दूध कमी होईल व शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य दर मिळेल. मुंढे यांनी दूध भेसळविरुद्धची मोहीम अशी सुरू ठेवावी, अशीही मागणी त्यांनी केली.

आंदोलनात खडकी सेवा संस्थेचे अध्यक्ष ज्ञानदेव भोसले, सरपंच भाऊसाहेब बहिरट, सोन्याबापु कोठुळे, दीपक वाबळे, राहुल कोठुळे, अरुण कोठुळे, अंबादास रोकडे, नवनाथ रोकडे, संतोष बहिरट, सतीश साळुंखे, संदीप चोभे, मिनीनाथ बेरड, राहुल निकम, भरत तांबे, ऋषिकेश निकम आदी सहभागी झाले होते.

दरम्यान अहिल्यानगर शहरातील विविध स्वयंसेवी संस्थांनीही तुकाराम मुंढे यांच्या धडक मोहिमेचे स्वागत करत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुकाराम मुंढे यांची आयुक्त पदावरून बदली करू नये, अशा मागणीची निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles