सरन्यायाधिशांवर बूट भिरकावणाऱ्याचा खा. लंके यांच्याकडून निषेध
राकेश किशोर यांना संविधानाची भेट देत जागरूकता
अहिल्यानगर : प्रतिनिधी
देशाचे सरन्यायाधिश भूषण गवई यांच्यावर बूट भिरकावल्याच्या घटनेनंतर देशभर खळबळ उडाली. या घटनेच्या निषेधार्थ खासदार नीलेश लंके यांनी नवी दिल्लीत गुरूवारी वकील राकेश किशोर यांच्या निवासस्थानी जाऊन संविधानाची प्रत आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची छायाचित्र भेट दिली.
पत्रकारांशी बोलताना खा. लंके म्हणाले, “राकेश किशोर यांनी संकुचित वृत्तीतून आणि मनूवादी विचारातून हे कृत्य केले. त्यांना विसर पडला की, आपण या संविधानामुळेच आपला परिवार अनेक वर्षांपासून चालवत आहोत. त्यामुळे या कृत्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी मी त्यांच्या निवासस्थानी आलो होतो.”
खा. लंके पुढे म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्माण केले. त्याचे संरक्षण करणे सरन्यायाधिश भूषण गवई यांचे काम आहे. त्यांच्या विरोधात घडलेले अवमानकारक कृत्य ही फक्त एका व्यक्तीची चूक नाही, तर देशाचा अवमान आहे. या भेटीत संविधानाची प्रत आणि डॉ. आंबेडकर यांचे छायाचित्र सुपूर्द करून मी त्यांना त्यांच्या जबाबदारीची आठवण करून दिली.”
खा. लंके यांनी स्पष्ट केले की, “राकेश किशोर यांना संविधान आणि डॉ. बाबासाहेबांचे विचार स्मरणात ठेवावे, यासाठी मी त्यांना भेटलो. हे कृत्य समाजात मनूवादी वृत्ती आणि अवमानकारक वृत्तीस प्रोत्साहन देणारे आहे, ज्याचा निषेध करणे आवश्यक आहे.”


