अहिल्यानगर -जिल्ह्यातील १३ पंचायत समिती सभापतीपदाच्या आरक्षणाची सोडत आज मंगळवार (दि. ७) रोजी नगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडत आहे. या आरक्षण सोडतीमध्ये सर्वसाधारणसाठी ३, सर्वसाधारण महिलांसाठी ३, ओबीसीसाठी २ आणि ओबीसी महिलेसाठी २, तसेच अनुसूचित जाती व जमाती (महिलेसह) ३ पदे हे सभापतीपदाचे आरक्षण हे चिठ्ठ्याव्दारे काढण्यात आले आहे.अशातच आता यामध्ये राहता आणि जामखेड पंचायत समितीचे आरक्षण हे ओबीसी महिलेसाठी राखीव झाले आहे. तर नेवासा आणि कर्जत हे ओबीसी पुरुषांसाठी आरक्षित झाले आहे. तसेच नगर, पारनेर आणि श्रीगोंदा हे खुला महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. याशिवाय पाथर्डी अनुसूचित जाती महिला, संगमनेर अनुसूचित जाती, अकोले अनुसूचित जमाती, कोपरगाव अनुसूचित जमाती महिला, श्रीरामपूर सर्वसाधारण, शेवगाव आणि राहुरी हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद गट व गणाच्या आरक्षण सोडतीसाठी अनुसूचित जाती व जमातीसाठी जागा निश्चित करण्यासाठी विहित नमुन्यातील प्रस्ताव तयार करून तो ८ ऑक्टोबरपर्यंत देण्यात येणार आहे. त्यानंतर १० ऑक्टोबर रोजी आरक्षण सोडतीची सूचना प्रसिद्ध करणे, १३ ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषदेचे गट जिल्हाधिकारी तर पंचायत समिती गणाच्या आरक्षणाची सोडत तहसीलदार यांनी काढणे, १४ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी यांनी प्रारूप आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध करणे, असे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे.


