दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गुडबुक मध्ये असलेले माजी आ.अमोल मिटकरी यांना राष्ट्रवादी कॉग्रेसने दुसऱ्यांदा विधानपरिषदेची संधी न दिल्याने ते नाराज झाले आहेत. अजितदादांच्या अपघाती मृत्युची सखोल चौकशी करण्याची मागणी मिटकरी सातत्याने करीत आहेत. अजितदादांचा मृत्यु अपघात नसून घातपात असू शकतो असा संशयही ते व्यक्त करीत असतात. यापार्श्वभूमीवर पक्षावर नाराज असलेल्या मिटकरी सोशल मिडियावर पोस्ट लिहून 14 मे पासून नवीन इनिंग सुरू करीत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे मिटकरी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. माजी आ.मिटकरी यांनी म्हटले आहे की,
सर्वांना सस्नेह जय शिवराय 🙏
आज दिनांक १३ मे २०२६ रोजी माझा विधान परिषद सदस्य म्हणून कार्यकाळ संपत आहे. आयुष्यातील हा केवळ एका पदाचा शेवट नाही, तर एका वादळी, संघर्षमय आणि शिकवण देणाऱ्या राजकीय प्रवासाचा महत्त्वाचा टप्पा आहे.
मागील सहा वर्षांत अनेक चढ-उतार पाहिले. संघर्ष पाहिला, टीका सहन केली, प्रसंगी एकटेपणही अनुभवले; पण महाराष्ट्राच्या जनतेने दिलेला विश्वास आणि प्रेम हेच माझं खरं बळ राहिलं. विधान परिषदेत आवाज उठवताना मी नेहमी सामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी आक्रमकपणे लढण्याचा प्रयत्न केला. राजकारणात भूमिका घेताना अनेकदा वादळं आली, पण त्या प्रत्येक वादळाने मला अधिक मजबूत केलं.
या प्रवासात उपमुख्यमंत्री अजितदादांचे मार्गदर्शन, विश्वास आणि साथ मला सतत मिळत राहिली. त्यांनी दिलेल्या संधीमुळे महाराष्ट्राच्या प्रश्नांवर काम करण्याची ताकद मिळाली. त्यांच्याप्रती मी मनापासून कृतज्ञ आहे.आज दादा नाहीत हे कटू सत्य व त्यांच नसणं हे जीवनातील सर्वात मोठं संकट आहे.त्यांचे उपकार मरेपर्यंत विसरू शकणार नाही..
आज पद संपत असलं तरी जनतेशी असलेलं नातं संपणार नाही. कारण माझ्यासाठी राजकारण हे केवळ पदासाठी नसून विचारांसाठी, नात्यांसाठी आणि समाजासाठी आहे. या काळात असंख्य जिवाभावाचे मार्गदर्शक मित्र जुळले ज्यांची सोबत प्रेरणा जागवणारी राहिली.
१४ मे पासून मी एका नव्या प्रवासाला सुरुवात करीत आहे. हा प्रवास अधिक संयमी असेल, अधिक प्रगल्भ असेल आणि महाराष्ट्राच्या मातीशी आणखी घट्ट नातं जोडणारा असेल. संघर्ष अजून संपलेला नाही; उलट नव्या उमेदीने पुन्हा उभं राहण्याची ही वेळ आहे.
ज्यांनी प्रेम दिलं, टीका केली, साथ दिली आणि विरोध केला त्या प्रत्येकाचा मी ऋणी आहे. कारण प्रत्येक अनुभवाने मला घडवलं.
माझा विश्वास आजही कायम आहे —
“वादळं कितीही मोठी असली आणि मातीशी नातं प्रामाणिक असलं, तर प्रवास कधीच थांबत नाही.”
आपला अमोल मिटकरी..#जय महाराष्ट्र


