होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून होणाऱ्या कच्च्या तेलाच्या व्यापाराला अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे अनेक देशात इंधन पुरवठ्याची साखळी विस्कळीत होत असल्याचं पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवरच आता भारताने देखील अधिक सावध भूमिका घेत उपाययोजना राबवण्यास सुरूवात केली आहे.
या अनुषंगाने पंतप्रधान मोदी यांनी जनतेला इंधन बचत करण्याचं आवाहन केलं आहे. त्या पार्श्वभूमीवर आता पंतप्रधान मोदी यांनी या आवाहनाची सुरूवात स्वत:पासून करण्याचा निर्णय घेत त्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या निम्म्याने कमी करण्याचे निर्देश एसपीजीला दिले आहेत अशी माहिती समोर आली आहे. या संदर्भातील वृत्त सूत्रांच्या हवाल्याने टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार त्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अधिकृतपणे कमी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या एसपीजीला आपल्या ताफ्यातील वाहनांची संख्या ५० टक्क्यांनी कमी करण्याचा प्रयत्न करण्यास सांगितलं आहे.
जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना इंधनाची बचत करण्याचं आवाहन केलं होतं. इंधनाची बचत करणं आणि पेट्रोल व डिझेल खरेदीवर खर्च होणारे परकीय चलन वाचवणं ही आपली जबाबदारी असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होतं.


